जातीपातीचे विष पेरणाऱ्यांना हद्दपार करा !
दोंडाईचा येथील दिवाळी स्नेह मिलन मेळाव्यात मविआचे उमेदवार संदीप बेडसे यांचे आवाहन शिंदखेडा मतदारसंघात भाजपाच्या नेत्यांनी जातीपातीचे विष पेरून अशांततेचे वातावरण निर्माण केले. कधीही विकासाचे राजकारण केले नाही. अशा विचारधारेच्या उमेदवाराला हद्दपार करण्याची आता गरज आली असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांनी केले. दोंडाईचा येथील सौरभ मंगल कार्यालयात झालेल्या दिवाळी स्नेह मिलन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, प्रदेश चिटणीस कामराज निकम, माजी नगराध्यक्ष जुई देशमुख, विठ्ठलसिंग गिरासे, शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, दीपक अहिरे, दीपक गिरासे, बापू महाजन, रवी जाधव यांच्यासह मव्याचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते,
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतमालाला भाव नाही, महागाईने परिसिमा गाठली आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, मतदार संघाचा कोणत्याही प्रकारे विकास केलेला नाही. फक्त जातीपातीचे विष पेरून समाजा समाजांमध्ये तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्याचे काम महायुतीचे सरकार आणि या भाजपाचे आमदाराने केले आहे. मात्र त्यांच्या कूटनीतीला बळी न पडता सर्वांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन संदीप बेडसे यांनी यावेळी केले. स्थानिक आमदारांची दडपशाही, हुकूमशाहीला पायबंद घालायचा असेल आणि मनमानी करणाऱ्या आमदाराला धोबीपछाड द्यायचा असेल तर पुढील वीस दिवस मला द्या पुढील पाच वर्ष तुमचा सेवक म्हणून राहील असे आश्वासन संदीप बेडसे यांनी यावेळी दिले.